सुखकर्ता दुखहर्ता
॥ सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची ॥ नुरवी पुरवी प्रेम, कृपा जयाची । सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची । कंठी झळके माळ, मुक्ताफळांची ॥ १ ॥ जय देव जय देव, जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ धृ ॥ रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी, कुमकुम केशरा । हिरेजडित मुकुट, शोभतो बरा । रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया ॥ २ ॥ जय देव जय देव, जय मंगलमूर्ती ॥ लंबोदर पीतांबर, फणिवरवंदना । सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना । दास रामाचा, वाट पाहे सदना । संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना ॥ ३ ॥ जय देव जय देव, जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥